कार्बनलेस उत्तरपत्रिकांच्या वापराबाबत उमेदवारांना विशेष सूचना .
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित सर्व वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी परीक्षांकरीता उत्तरे नोंदविण्यासाठी कार्बनलेस उत्तरपत्रिकांचा वापर करण्यात येतो . परीक्षेच्यावेळी उमेदवारांनी सोडविलेल्या उत्तराच्या आधारे परीक्षेमध्ये किती गुण मिळाले आहेत याची उमेदवाराला माहिती ज्ञात व्हावी , निकाल प्रक्रिया पारदर्शक व अचूकपणे व्हावी , कोणत्याही तक्रारीला वाव राहू नये या हेतूने कार्बनलेस उत्तरपत्रिकांचा वापर केला जातो . त्यामध्ये उत्तरपत्रिकेचा भाग -१ ( मुख्य प्रत ) समवेक्षकामार्फत आयोगाकडे जमा करावयाची असते तर उत्तरपत्रिकेचा भाग -२ ( दुय्यम प्रत ) उमेदवाराने स्वतःकडे ठेवावयाची असते . तथापि , सदर कार्बनलेस उत्तरपत्रिकांचा वापर करताना आयोगाने दिलेल्या सूचनांचे अनेक उमेदवारांकडून पालन होत नसल्याचे व त्यामुळे उमेदवारांचे नुकसान होत असल्याची बाब निदर्शनास आली आहे . उदा . प्रश्नपुस्तिकेचा संच क्रमांक उत्तरपत्रिकेवर अचूकपणे न लिहिल्यामुळे काही पूर्व परिक्षांमध्ये शेकडो उमेदवारांना शुन्य गुण मिळाले . उमेदवारांकडून होणा -या चुका व परिणामी उमेदवारांचे होणारे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी कार्बनलेस उत्तरपत्रिकांच्या संदर्भात खाली नमूद केलेल्या सूचनांचे उमेदवारांनी कटाक्षाने पालन करावे :
( १ ) उत्तरपत्रिका काळजीपूर्वक हाताळावी . ती हाताळताना वा उत्तरे लिहिताना चुरगळू नये , फाडू नये अथवा टाचणी किंवा टॅगने छिद्रे पाडू नयेत . तसेच , सदर उत्तरपत्रिका पाण्याने , घामाने अथवा धुळीने खराब होणार नाही , याची दक्षता घ्यावी .
( २ ) उत्तरपत्रिकेवरील माहिती भरण्यासाठी व योग्य उत्तराचे वर्तुळ छायांकित करण्याकरिता फक्त काळया शाईचे बॉल पॉईंट पेन वापरावे . हे करतांना दुय्यम प्रतीवरही स्पष्ट खूण दिसण्यासाठी पुरेसा दाब द्यावा .
( ३ ) उत्तरपत्रिकेवरील मजकुरामध्ये बदल करण्यासाठी While Fluid . Blade अथवा तत्सम साधनांचा कोणत्याही परिस्थितीत वापर करु नये .
( ४ ) परीक्षा कालावधीतच उत्तरपत्रिकेवर परीक्षेचे नांव , बैठक क्रमांक ( Roll Number ) , प्रश्नपत्रिका क्रमांक , संच क्रमांक , प्रवेश प्रमाणपत्रावर नमूद केलेला विषयाचा संकेतांक ( Subject Code ) योग्य ठिकाणी इंग्रजीमध्ये व अचूकपणे नमूद करुन विहित ठिकाणी स्वाक्षरी करावी .
( ५ ) उत्तरपत्रिकेवर स्वतःचे नांव अथवा स्वतःची ओळख पटेल असा कोणताही तपशील नमूद करु नये
( ६ ) प्रश्नपुस्तिकेवरील इंग्रजी आद्याक्षरातील संच क्रमांक ( उदा . A , B , C किंवा D ) उत्तरपत्रिकेवर विहित ठिकाणी अचूकपणे नमूद करावा . तसेच , सदर संच क्रमांकाचे संबंधित वर्तुळ अचूकपणे छायांकित करावे .
( ७ ) प्रश्नपुस्तिकेचा संच क्रमांक उत्तरपत्रिकेवर अचूकपणे न नोंदविल्यास शून्य गुण देण्यात येतात .
( ८ ) उत्तरपत्रिकेवर प्रश्नांच्या उत्तराचे संबंधित वर्तुळ आवश्यक दाब देवून छायांकित करावे जेणेकरुन त्याचा छाप ( Impression ) उत्तरपत्रिकेच्या कार्बनलेस प्रतीवर ( भाग -२ ) वर व्यवस्थित उमटेल याची आत्यंतिक दक्षता घेण्यात यावी .
( ९ ) प्रश्न क्रमांकासमोर दिलेल्या चार पर्यायांपैकी उमेदवाराने निवडलेल्या उत्तराचे वर्तुळच उत्तरपत्रिकेवर छायांकित करावे .
( १० ) प्रश्नाचे उत्तर नमूद करण्याकरिता प्रत्येकी एकच वर्तुळ छायांकित करावे . एकापेक्षा अधिक वर्तुळे छायांकित केल्यास अथवा तसा कोणत्याही प्रकारे प्रयत्न केल्यास अशा उत्तरास गुण दिले जात नाहीत व ते चूक समजण्यात येते.
( ११ ) एकदा नमूद केलेले उत्तर खोडता येणार नाही . नमूद केलेले उत्तर खोडून नव्याने नमूद केल्यास अथवा त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल केल्यास ते तपासले जात नाही .
( १२ ) उत्तरपत्रिकांचे मुल्यांकन करताना उत्तरपत्रिकेत नमूद केलेल्या बरोबर उत्तरांनाच गुण दिले जातात . तसेच संबंधित परीक्षेच्या परीक्षा योजनेमध्ये विहित केलेल्या प्रमाणानुसार , चुकीच्या उत्तरांमागे एका प्रश्नाचे गुण , एकूण गुणांमधून वजा करण्यात येतात .
( १३ ) परीक्षेचा कालावधी संपेपर्यंत उत्तरपत्रिकेचा भाग -२ मूळ उत्तरपत्रिकेपासून कोणत्याही परिस्थितीत वेगळा करु नये , अथवा उघडण्याचा प्रयत्न करु नये .
( १४ ) परीक्षेनंतर मूळ उत्तरपत्रिका ( भाग -१ ) समवेक्षकाकडे जमा करताना ती भाग -२ पासून विहित ठिकाणी ( Perforation mark वर ) व्यवस्थितरित्या फाडून , वेगळी करावी .
( १५ ) मूळ उत्तरपत्रिकेपासून भाग -२ वेगळा करताना मूळ उत्तरपत्रिका फाटणार नाही , अथवा चुरगळणार नाही , याची आत्यंतिक दक्षता घ्यावी .
( १६ ) परीक्षेनंतर उत्तरपत्रिकेचा भाग -१ समवेक्षकाकडे जमा करताना उमेदवारांकडील उत्तरपत्रिकेची प्रत ( भाग -२ ) समवेक्षकाकडे जमा करु नये .
( १७ ) उमेदवारांकडील उत्तरपत्रिकेचा भाग -२ हा सुध्दा महत्वाचा दस्तऐवज असल्याने तो व्यवस्थित व सुरक्षितपणे निवडप्रक्रियेचा अंतीम निकाल लागेपर्यंत जतन करावा .
( १८ ) परीक्षेनंतर उमेदवाराकडील भाग -२ वर कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही प्रकारचा बदल अथवा खाडाखोड करु नये ,
( १ ९ ) निवड प्रक्रियेमध्ये जास्तीत जास्त पारदर्शकता तसेच अचूकता आणण्याचा आयोगाचा उद्देश असल्याने विविध प्रकारची तपासणी किंवा पडताळणी आयोगाकडून केली जाते . यामध्ये शासनाचे राजपत्रित अधिकारी होवू इच्छिणा – या उमेदवारांमध्ये आवश्यक असणारा प्रामाणिकपणा व शिस्त याची पडताळणीही होवू शकते . त्याकरीता भविष्यात कोणत्याही टण्यावर उमेदवारांकडील उत्तरपत्रिकेचा भाग -२ आयोगाकडून मागविला जावू शकतो . त्यावेळी उमेदवाराने मूळ स्वरूपातील उत्तरपत्रिकेचा भाग -२ सादर करणे अनिवार्य आहे .
(२०) सदर उत्तरपत्रिका ही आयोगाची मालमत्ता असून ती , कोणत्याही प्रकारे अनधिकृतपणे हाताळण्याची अथवा जवळ बाळगण्याची कोणत्याही व्यक्तीला परवानगी नाही . अशी कृती अनधिकृत व बेकायदेशीर समजण्यात येते .
(२१) वरील सूचनाचे काटेकोर पालन करण्यात यावे . अन्यथा आयोगाच्या सूचनांचे उल्लंघनासाठी आयोगाच्या परीक्षांना प्रतिरोधनासह ( Debarment ) अन्य योग्य ती कायदेशीर कारवाई होवू शकते.
–महाराष्ट लोकसेवा आयोग